Wednesday, June 19, 2024
Homeजरा हटकेअमावस्येच्या रात्री प्रवास करण्याची चूक का करु नये.? बघा काय घडले.. एक...

अमावस्येच्या रात्री प्रवास करण्याची चूक का करु नये.? बघा काय घडले.. एक सत्य कथा..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. गुरूचरित्र, नवनाथ भक्तीसार, गजानन विजय, श्री साईसच्चरित अशा धार्मिक ग्रंथामध्ये एक विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती असते. ती दैवी शक्ती संकट काळात ते ग्रंथ ज्या व्यक्तीसोबत असतील त्यांचे रक्षण करते. या सर्व गोष्टींवर ज्यांचा अजिबात विश्वास बसत नाही, अशा सुशिक्षित अतिशहाण्या लोकांसाठी. ही एक सत्य कथा आहे. प्रवास करत असताना काही जागा, वळणे, चौक बाधित असतात, तिथे चकवा लागतो. तो चकवा त्या प्रवाशांना अशा ठिकाणी नेतो की, जिथुन परत मागे फिरताच येत नाही.

जुन जुलै महिन्यातील घटना आहे. मी, केदार, प्रसाद आणी सुशांत असे चौघे मित्र पुण्याहुन इनोव्हा गाडीने माहुर (विदर्भ) येथे गेलो होतो. संध्याकाळच्या सुमारास कारंजा येथे पोहोचलो. कारंजा येथे दर्शन घेऊन पुढे 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या माहुरला पोहोचायचे असे आम्ही ठरवले होते. पण सतत पडणारा पाऊस आणी गाडी बंद पडणे यामुळेच कारंजा येथे पोहोचायला रात्रीचे 8.30 वाजले.

तिथे दर्शन घेऊन व जेवण होईपर्यंत 10 वाजले. रात्री 10.30 वाजता गाडी सुरू करून माहुरला प्रस्थान केले. त्याआधी आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथे तिन गुरूजी उभे होते. त्यांना कारंजा बस स्थानकापर्यंत आम्हाला लिफ्ट मागीतली. त्यांना तेथून शेगावची गाडी पकडायची होती.

त्या तिन गुरूजींना बस स्थानकात सोडुन आम्ही पुढे निघालो. थोडं पुढं आल्यानंतर प्रसादला गाडीच्या मागच्या सीटवर एक बॅग दिसली. बहुतेक त्या गुरूजींचीच बॅग राहिलेली होती. ती परत देण्यासाठी आम्ही गाडी वळवुन परत बस स्थानकात आलो.

बसस्थानकावर आम्ही त्या गुरूजींना शोधले पण त्यांना गाडी लगेचच मिळाली होती. शेवटी केदारने ती छोटी बॅग आपल्या सॅकमध्ये ठेवली. केदारला एक खुप वाईट सवय होती. सतत त्याच्या पाठीवर सॅक असायची. काहीही झाले कोठेही गेला तरी तो ती सॅक काही काढुन बाजुला ठेवायचा नाही.

रात्री अकरा वाजता आम्ही माहुरच्या रस्त्याला लागलो. सोबत पाऊस व काळोख होता. कारंजा ते माहुर साधारण 110 किलोमीटर चा आडमार्ग होता. कारंजा सोडले की, 10 किलो मीटर नंतर जंगल भाग आहे. रात्रीच्या वेळेस एखादीच गाडी क्वचित दिसत होती. वाटेत लागणारी छोटी गावे सोडली तर भयाण शांतता होती.

मुसळधार पाऊस, थंडगार वारा आणी दिवसभराच्या प्रवासाचा थकवा यामुळे बाकी मित्र ढाराढूर झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. एकटाच जागा असल्याने बाहेर पडणारा पाऊस, अंधार, भयाण शांतता, अनोळखी रस्ता, दूसरी एखादी गाडी सोबत नाही. हि गाडी तर आज दिवसभर बंद पडत होती त्यामुळेच वाटेत गाडी बंद पडली तर काय? हि भिती.

गाडीतील टेप सुरू करून गाणी लावली. कारंजा ते मानोरा असा साधारण 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मला पण झोप यायला लागली. म्हणून मानोरा येथे थांबलो. चहावाल्याकडे चहा घेतला. तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.

चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. तासभर सरळ रस्ता लागला. 10/15 किलोमीटर पुढे गेल्यावर वाटेत दोन रस्ते लागले. आसपास पाहिले बोर्ड नव्हता. दोनपैकी कोणत्या रस्त्याने जायचे? गोंधळून गेलो. एक रस्ता सरळ जात होता तर दुसरा तिरपा जात होता. अशा वेळेस अनुभवी ड्रायव्हर घेतो तोच निर्णय मी घेतला. सरळ रस्त्याने पुढे जाणे. मी पुढे आलो पण पुढे बरेच अंतर आलो तरिही कोणतेच गाव दिसत नव्हते. माहुर चा उल्लेख पण दिसत नव्हता. वाटेत एकही गाडी नाही. फक्त पाऊस आणी वेगळीच भयानक शांतता!

लक्षात आले की, आपण रस्ता चुकलो. चुकीच्या रस्त्यावर आपण गाडी घेतली. अशा वेळेस अनुभवी ड्रायव्हर जे करतात ते माझ्या लक्षातच आले नाही. गाडी परत मागे वळवणे. रात्रीचे दिड वाजले होते. मी नुसताच गाडी चालवत होतो. आत्ता बाकीचे तीघे झोपेतून जागे झाले. मी त्यांना म्हटले की,

सुशा आपण रस्ता चुकलोय. आता सरळ पुढे जावु. जिथे फाटा दिसेल तिथे गाडी वळवु. बाकीचे तिघे भितीने थंड पडले. कारण आज दिवसभर गाडीने खुप नाटके केली होती. अशा परिस्थितीत जर गाडी बंद पडली तर काय करायचे? हाच विचार आमच्या चौघांच्याही मनात होता.

रस्ता काही संपत नव्हता. पाऊण तास झाला. पाऊस, थंडी, वारा आणी भिती यांचा परिणाम म्हणजे एक नंबरला लागणे. पोट फुल्ल झाले होते. वाटेत गाडी थांबवून मोकळे व्हायचे असे ठरवले. त्याच वेळेस डाव्या बाजुला एक मोठे फार्म हाऊस दिसले. हायसे वाटले.

इथेच पोट मोकळे करू. आत जाऊन माहुरचा रस्ता विचारू आणी पुढे जाऊ. असा विचार आम्ही केला. फार्म हाऊस च्या बाहेर आम्ही गाडी थांबवली. मी मोकळा होण्यासाठी गाडी थांबवली. पाय मोकळे करण्यासाठी आणी फार्म हाऊस मध्ये जाऊन रस्ता विचारण्यासाठी बाकीचे तीघे पण उतरले.

केदारने सवयीप्रमाणे त्याची सॅक पाठीवर अडकवली होती. आम्ही गाडीतून छत्र्या बाहेर काढल्या. मी व सुशांतने शु केली. आणी आम्ही फार्म हाऊस कडे निघालो. ते फार्म हाऊस म्हणजे जुनाट पद्धतीचे मोठ्ठ घर होते. सुरूवातीलाच एक मोठ्ठे लिंबाचे झाड लागले.

घराबाहेर एक बल्ब लावला होता. त्याच्या प्रकाशात बाहेरचा भाग दिसत होता. एका बाजुला बैलगाडी होती. तीच्या आसपास चारा दिसत होता. एक कुत्र त्या बैलगाडीखाली झोपलेल दिसले. तीथले वातावरण अचानक वेगळेच वाटु लागले. पाऊस, काळोख आणी तेथील वातावरण! अचानक सुशांत चे लक्ष घराच्या बाहेरच्या एका कोपर्‍यात गेले.

तेथे एक माणूस वरून इतका मुसळधार पाऊस पडत असतानाही डोक्यापासुन ते पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोप लेला होता. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे वरून येवढा पाऊस पडत असतानाही तो भिजलेला नव्हता.

रस्ता विचारावा आणी काहीतरी मदत होईल या अपेक्षेने आम्ही थोडे जवळ गेलो. घराचा दरवाजा उघडाच होता. आत पाहिले तर आतही चार पाच माणसे अशीच झोपलेली होती. दार उघडे असल्याने मी व सुशांतने दार वाजवून दादा, काका अशा हाका मारल्या. कोणीच उठत नाही म्हटल्यावर आम्ही दरवाजातून आत जायचे ठरवले.

आम्ही आत पाय टाकणार येवढ्यातच विज कडाडली आणी ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकु आला. अचानक केदार ओरडला. सुशा, तेजा, प्रसाद थांबा. आत जाऊ नका. इथुन पटकन चला. बाहेर पडा. लवकर! असे म्हणत केदारने आम्हाला मागे ओढतच आणले आणले. केदारला अचानक काय झाले तेच आम्हाला समजत नव्हते. पण त्याच्यात येवढी ताकद आली होती की, आम्हा तिघांनाही त्याने ओढतच नेऊन गाडीत बसवले.

हे काय चाललंय आम्हाला काहीच समजत नव्हते. आज दिवसभर नाटकं करणारी गाडी एकाच प्रयत्नात लगेचच सुरू झाली. आमचे चौघांचेही डोके दुखायला लागले. आता सुशांत गाडी चालवत होता. आम्ही सर्वजण एकमेकांकडे बघत होतो. कुणीच काहीच बोलत नव्हते.

घडलेले समजण्याच्या पलिकडे होते. पहाटेचे तीन वाजले होते. दोन तास आम्ही सरळ रस्त्याने जात होतो. पण कुठे जातोय तेच कळत नव्हते. आमच्या सोबत हे नक्की काय चाललंय? आम्ही किती अंतर कापलेय? आम्ही कुठे जात आहोत? आम्हाला काही म्हणजे काहीच समजत नव्हते. एव्हाना पहाट झाली. पहाटेचे पाच वाजले आणी आम्हाला एक चौक दिसला. त्या चौकात लावलेली पाटी दिसली आणी आम्ही तिघेपण जोरात ओरडलो.

सुटलो बाबा एकदाचे! एकीकडे माहुर, एकीकडे दारव्हा आणी तिसरीकडे मानोरा असा फलक होता. माहुरच्या रस्त्याला आम्ही लागलो. वाटेत गाड्या दिसत होत्या. माहुरचे फलक दिसत होते. रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो. चहा घेण्यासाठी.

चहा घेत घेत आम्ही ते घर, ती माणसे आणी रात्रीचा तो प्रसंग याचीच चर्चा आम्ही करत होतो. चहावाला आश्चर्यचकित होऊन आमच्या गप्पा ऐकत होता. अचानक तो बोलला की, तुम्ही त्या शेतातल्या रस्त्याने आलात तरिही तुम्ही वाचला? आम्ही त्या चहावाल्याकडं बघत ओरडलो. काय म्हणताय भाऊ, तिथ गेलेली माणसं वाचत नसत्यात. भुलभुलैया हाय त्यो रस्ता. औसंच्या राती तिथ जे जातात त्यांना गिळतोय त्यो रस्ता. काल औस असुनपण तुम्ही वाचलात पोरांनो, नशिबवान आहात.

एक मिनिट भाऊ, निट सांगा काय होतं ते? जे काही होतं ते खुप डेंजर होतं. देवाची कृपा समजा. तुम्ही वाचलातं पोरांनो. मारूतीला नारळ फोडा. गुरूंचे दर्शन घ्या. त्या चहावाल्याचा चेहरा मला ओळखीचा वाटत होता. याला मी कुठेतरी पाहिलंय याची जाणीव माझं मन मला करून देत होतं पण कुठे पाहिलंय ते मात्र आठवत नव्हतं.

माहुरला पोहोचायची घाई असल्याने आम्ही चहा पिऊन माहुरचा रस्ता धरला. तासाभरात माहुरला पोहोचलो. खरेतर रस्ता चुकल्याने 150 किलोमीटर चा प्रवास फुकट झाला होता. येवढंच समजत होतं. तो चहावाला काय बोलला? त्याला आपण कुठे पाहिलंय? हे सर्व प्रश्न आम्ही विसरून गेलो.

माहुरला दर्शन घेऊन आम्ही निघालो. गाडीत बसलो. गाडी सुरू करण्याअगोदर अनुभवी ड्रायव्हर डिझेल किती आहे आणी आपण किती किलोमीटर प्रवास केला हे नेहमीच चेक करतो. त्याप्रमाणेच मी पण चेक करायला लागलो. आणी मला खुप मोठ्ठा धक्काच बसला. मी बाकीच्या तीघांकडे बघत ओरडलो.

कारंजा ते मानोरा अंतर 40 किलोमीटर. मानोरापासुन पुढे जिथे आम्ही रस्ता चुकलो ते अंतर 20 किलोमीटर. पहाटे पाच वाजता आम्हाला दिसलेला तो चौक ते माहुर हे 40 किलोमीटर अंतर. किलोमीटरचा आकडा जवळपास 110 किलोमीटर इतकाच पुढे सरकलेला होता. मग रात्री 12.30 ते पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही ज्या रस्त्यावर फिरत होतो, ते अंतर किलोमीटरचा आकडा का दाखवत नव्हता? ते अंतर गेले कुठे?

शिवाय गाडीतलं डिझेल सुद्धा आहे तसच होतं. मी त्यांना म्हटले की, काहीतरी गडबड दिसतेय. मला तो पहाटेचा चहावाला आठवला. मी म्हटले आपण तो चहावाला गाठु. आम्ही परत येताना त्या चहाच्या टपरीवर गाडी थांबवून चहावाल्याकडे गेलो. तिथं कोणीचं नव्हत. प्रसादने मोठ्याने हाक मारली भाऊ, भैया. रस्त्याच्या दुसरया बाजुनं आलो आलो करत एक माणूस धावत आला. आणी म्हणाला. बोला साहेब काय देऊ? तो चहावाला दुसराच कोणीतरी होता. ते दुसरे भाऊ कुठे आहेत? कोण भाऊ?

जे पहाटे पाच वाजता येथे चहा घेताना होते ते? नाही साहेब, हे हाॅटेल माझेच आहे. इथे तर मीच असतो. तुम्ही नक्की कोणाला भेटला? आता मात्र आम्हाला धक्काच बसला. आम्हाला आठवत होते की, चौकातुन पुढे आल्यावर लगेचच हि चहाची टपरी आम्हाला दिसली होती. आणी आम्ही इथेच चहा पिला होता. चौक ते या चहाच्या टपरी पर्यंत दुसरी कोणतीच टपरी तेथे नव्हती.

मग पहाटे भेटलेला तो चहावाला कुठे गेला? तो ओळखीचा का वाटत होता? रस्ता चुकणं, अनोळखी रस्त्यावर फिरणे हे सुशिक्षित मनाला पटत होतं समजत होतं. पण तो न भिजलेला माणूस, ते जुनाट घर, आतमध्ये प्रेतासारखी झोपलेली माणसे, तेथे केदारचे विचित्र वागणे, तो किलोमीटरचा गोंधळ आणी पहाटे भेटलेल्या त्या चहावाल्याने जे काही सांगीतले होते. हे काही सुशिक्षित मनाला पटत नव्हते. पण तो चहावाला गेला कुठे?

आम्ही चौकात आलो. तिथे तर आणखीनच गोंधळ वाढला. कारण पहाटे पाच वाजता आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो होतो. तो रस्ताच तेथे नव्हता. त्या चौकात तीनच रस्ते होते.

पहाटे आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तेव्हा आम्हाला तीन रस्त्याच्या पाट्या दिसत होत्या. एक रस्ता मानोराला जाणारा. एक रस्ता दारव्हाला जाणारा आणी एक रस्ता माहुरला जाणारा होता. पण आम्ही ज्या रस्त्याने इथपर्यंत आलो होतो तो रस्ता कुठेच दिसत नव्हता राव. डोकं जड झाले होते पण सुशिक्षित म’न असले प्रकार कधीच मानत नाही. खरं म्हणून विश्वास ठेवत नाही.

चौकात पाटी पाहिली तर कारंजाकडे परत दारव्हा मार्गे जाणारा रस्ता 110 किलोमीटर चा होता. तर काल आम्ही मानोरा मार्गे ज्या रस्त्याने आलो तो रस्ता 150 किलोमीटर चा होता. आम्ही विचार केला की, दिवस आहे. तेव्हा आपण काल ज्या रस्त्याने आलो तोच रस्ता पकडून रात्री काय झाले ते शोधुन काढु या. 40 किलोमीटर अंतर जास्त जावे लागेल.

काल रात्री येताना आम्ही जिथे रस्ता चुकलो होतो तो पाॅईन्ट आम्हाला शोधायचा होता. आम्ही 50 च्या स्पिडने शोधत शोधत पुढे जात होतो. आम्ही मानोरात येऊन पोहोचलो पण तो रस्ता आणी तो पाॅईन्ट काही आम्हाला दिसलाच नाही. तो रस्ता, तो पाॅईन्ट सर्व काही गायब झाले होते.

रात्री मानोरातुन निघताना आम्ही जिथे चहा घेतला होता. त्या चहाच्या टपरीवर आम्ही गेलो. तिथे चहा घेत घेत सुशांत ने त्या चहावाल्याला विचारले की, भाऊ पुढे 20 किलोमीटर वर दोन रस्ते मिळतात ते गाव कुठले ओ? कुठला रस्ता आहे तो?

चहावाल्यानं भुत बघीतल्यासारखे आश्चर्यचकित होऊन डोळे फाडून आमच्याकडे बघीतले आणी म्हणाला. तुम्हाला तो रस्ता भेटला? औसला गेला व्हता त्या रस्त्यानं? हो दादा खुप लांबचा फेरा झाला पहाटे पर्यत आम्ही रस्ता चुकलो होतो.

आगागा! पोरंहो त्यो लांबचा फेरा नव्हता बाबानो मरणाचा फेरा व्हता त्यो. त्या रस्त्यावरून जो जातो तो परत कधीच येत नाही. रस्ता गिळतो त्याला. तुम्ही परत कसं काय आला पोरहो? आम्ही त्या वयस्कर चहावाल्याला रात्री जे काही घडले ते सर्व सांगीतले. तो चहावाला म्हणाला की,

त्यो भुलभुलैया हाय. चकवा! त्यात जो कोणी जातो तो तिथेच गडप होतो. अवसेच्या सापळ्यात अडकतो माणुस. घेरी येते. तुम्हाला दिसलं काय? तुम्ही बाहेर आला कसं? रात्री माझा ल्योक होता इथ. त्यो तुम्हाला सांगायच विसरला की, आज औस हाय. आडवी वाट पकडु नका म्हणून!

तुम्हाला घेरी आली व्हती. ते घर नव्हतं तर काळ होता. आणी ती झोपलेली माणसं नव्हती तर ती मेलेली मढी होती. तुम्ही जर त्या घरात गेला असता तर तुम्ही पण असेच पडला असता मढी होऊन. औसच्या रातीच तो रस्ता उघडा होतो. ज्याला घेरी आली असलं तोच त्या वाटन जातो आणी फसतो. त्यातन ज्यान रात काढली तोच वाचतो. ज्यो कोणी त्या घरात गेला त्यो मेला. तुमी लै नशीबवान बघा. देवाची किरपा म्हणून परत आलात त्या घराच्या दारातुन. आतापर्यंत लयं किस्से ऐकलेत म्या त्या वाटंचे.

आमचा अजुनही विश्वास बसत नव्हता पण रात्री जे काही घडले होते ते आम्ही नाकारू शकत नव्हतो. आम्ही फसलो कसे? या प्रश्नापेक्षाही आता त्या चहावाल्याने विचारलेला आम्ही वाचलो कसे? हा प्रश्न आता आमच्या दृष्टिकोनातून खुप महत्वपूर्ण होता.

आम्ही कसे वाचलो? रात्री त्या घराचा उंबरठा ओलांडला असता तर? केदारने आम्हाला मागे खेचले नसते तर? येस, केदार! आम्ही केदारकडे आभार प्रदर्शन केले. पण केदारला सुद्धा कळत नव्हते.

चहावाल्याने आम्हाला सांगीतले की, तुम्ही कारंजातील मंदिरात असणाऱ्या पाठक भडजींना भेटा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पाठक भडजींना भेटुन सर्व काही सांगीतले. त्यांनी सांगीतले की, तुम्हाला घेरी आली होती हे खरेय पण तुम्ही गुरू महाराजांच्या आशिर्वादाने वाचलात. दैवी शक्ती होती त्यावेळेस तुमच्यासोबत. विशेषतः केदारकडे.

दैवी शक्ती आमच्या सोबत? केदारचं का? अचानक सुशांतला काहीतरी क्लिक झाले. त्याने केदारच्या पाठिवर असणारी त्याची सॅक घेतली आणी त्यात तो काहीतरी शोधु लागला. आणी आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. केदारच्या सॅकमध्ये त्या गुरूजींची विसलेली छोटी पिशवी होती. आणी त्या पिशवीमध्ये गुरूचरित्र ग्रंथ होता.

या ग्रंथानेच आमचे रक्षण केले होते. आम्ही पाणावलेल्या डोळ्यांनी मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार केला. आजही तो ग्रंथ मी जपुन ठेवलेला आहे. दरवर्षी आम्ही चौघे गुरूचरित्र ग्रंथाचे पारायण करतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular